धामणगाव रेल्वे :-
चैत्र नवरात्रीमध्ये सर्व भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्ती आणी श्रद्धेचा अनुपम संगम येथील प्राचीन माताजी देवस्थानवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरुन दिसत आहे.
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या पुरातन माताजी देवस्थानात चैत्र व अश्विन नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्रनिमित्त विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांतर्फे नवसापोटी २५१ अखंड दीपज्योत सतत ९ दिवसांपर्यंत लावण्यात आली आहे. सप्तमीला देवीचा कुमकुम अभिषेक करण्यात येईल. अष्टमीला होमहवन तर २६ मार्च रोजी श्रीराम नवमीला महाप्रसादाने नवरात्री उत्सवाची सांगता होईल. मंदिर परिसरात महादेव, भैरवबाबा, शीतलामाता आदींची देवालये असून मुख्य गर्भगृहात आदी शक्तीची संगमवरी मूर्ती असून आजूबाजूला वैष्णव देवीची झांकी, तर एका बाजूला शंकराची पिंड देखावा म्हणून ठेवली आहे. दररोज सकाळी कन्या भोजनमध्ये शेकडो बालिकांना भोजन देण्यात येते. तर पहाटे होणाऱ्या मंगलाआरतीला पंचक्रोशीतील शेकडो महिला भगिनी दूरदूरुन चालत येऊन कार्यक्रमात सहभागी होतात. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुजारी पप्पू महाराज यांच्यासह शेकडो भक्त परिश्रम घेत आहेत.
