पहिल्याच दिवशी चन्याला ५५११ रुपये प्रति क्विंटल उच्चांकी भाव
धामणगाव रेल्वे :- विदर्भातील शेतकरी बंधूंना विविध सेवा-सुविधा पुरविणाऱ्या धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारात आज गुरुवारी शुभमुहूर्तावर नवीन चना खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या सभापती कविताताई श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते या खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.
चना खरेदीच्या पहिल्याच दिवशी बाजारात चन्याला ५५११ रुपये प्रति क्विंटल इतका उत्कृष्ट भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आडते ओमप्रकाश लाहोटी यांच्या आडतमधील जुना धामणगाव येथील शेतकरी स्वप्नील विंचुरकर यांच्या चन्याला ५५११ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच आशिष कापसे यांच्या आडतमधील भिल्ली येथील शेतकरी आशिष पाटील यांच्या शेतमालाला ५५०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हा शेतमाल खरेदीदार मनिष केला यांच्या मनिष ट्रेडर्स यांनी खरेदी केला.
या शुभारंभ कार्यक्रमात चना विक्रीसाठी आलेल्या शेतकरी बंधूंचा समितीचे संचालक देवरावजी बमनोटे, संदीप दावेदार, राधेश्याम चांडक, दिनुभाऊ जगताप, डॉ. प्रमोद रोघे, गिरीष भुतडा, मुकुंद माहोरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सभापती कविताताई गावंडे यांनी काटापूजन करून तोलमाप करणाऱ्या हमाल बांधवांचा देखील शाल-श्रीफळ देऊन गौरव केला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, संजय गाडे, खरेदीदार मनिष केला, संजय अग्रवाल, सचिन गंगण, प्रदीप कुचेरीया, मनिष भटटड, राजेश गंगण, माजी संचालक अशोक कांकरीया, नवनिर्वाचित नगरसेवक जगदीश रॉय, आडते असोसिएशनचे पवन लाहोटी, प्रविण पनपालिया, देवराव कापसे, आशिष कापसे, संतोष लाहोटी, नंदु राठी, कैलास राठी, गणेश पनपालिया, दिपक राजनकर, मुकेश पनपालिया तसेच समितीचे कर्मचारी दिनेश गोमासे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
चना खरेदीच्या शुभारंभास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळात बाजार समितीत चन्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
