अमरावती:-
जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्राना भेटी
पहिल्याच दिवशी प्रशासनाचा कडक पहार
: बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. जिल्ह्यातील १३७ केंद्रांवर पहिल्या दिवशीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ‘कॉपीमुक्त’ अभियानामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता दिसून आली. आज एकाही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही.
कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संस्था प्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रावरील कोणत्याही गैरप्रकारासाठी या समितीला जबाबदार धरले जाणार आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्था प्रमुखांशी संवाद साधून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. प्रशासनातर्फे भरारी व बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
आज जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी अमरावतीतील विद्याभारती येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी नांदगाव पेठ येथील दोन केंद्राची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कोणत्याही केंद्रावर बाहेरून असामाजिक तत्वांचा उद्रेक आढळून आला नाही.
जिल्हा प्रशासनाने धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज उपवनसंरक्षक अग्रीम सैनी, निता कट्टे, किर्ती जमदाळे यांनी परिसरातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच मेळघाटातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
केवळ शिस्तच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सोयीचाही विचार प्रशासनाने केला आहे. परीक्षा कालावधीत विद्युत पुरवठा अखंडित रहावा आणि परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी सहकार्य करावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परीक्षेत कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिस ॲक्ट १९८२’च्या कलम ८ सह भारतीय दंड विधानाच्या कलम ३४, १८८ व १२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. बारावीच्या परीक्षा केंद्रावर अनुचित आणि कॉपीचा प्रकार होत असल्यास याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
